नवी दिल्ली : न्यूझीलंड संघ भारताविरुद्धच्या जागतिक अजिंक्यपद कसोटी अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज होत असून, किवी संघ रणनीती आखण्यात मग्न झाला आहे. न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्स याने भारतीय वेगवान गोलंदाजी न्यूझीलंडच्या तोडीची असल्याचे सांगतानाच, किवी संघाला अंतिम सामन्यात रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा या अनुभवी फिरकी गोलंदाजांची अधिक चिंता असल्याचे म्हटले आहे.भारत आणि न्यूझीलंड संघ १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साउदम्प्टनच्या एजिस बाउल मैदानावर भिडतील. येथील खेळपट्ट्या साधारणपणे फिरकी गोलंदाजीस पोषक ठरत असल्याने किवी संघाला सध्या ही गोष्ट चिंतेत टाकत आहे. कसोटी सामन्यांत सध्या फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडच्या निकोल्सने हीच चिंता व्यक्त केली आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले की, ‘भारताकडे खूप चांगले वेगवान, आक्रमक गोलंदाज आहेत. याशिवाय त्यांचा फिरकी माराही अनुभवी आहे. त्यांनी जगभरात चांगले क्रिकेट खेळले असून, त्यांची गोलंदाजी शानदार आहे.’ भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण न लागल्यास अंतिम सामन्यात विराट सेना जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी, अशा सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांसह खेळेल.
डब्ल्य यूटीसी फायनल स्वप्नवत : पुजारा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने न्यूझीलंडविरुद्ध डब्ल्य यूटीसी फायनल आमच्यासाठी स्वप्नवत आहे. हा सामना कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना संबोधणे योग्य ठरेल, असे म्हटले आहे. ‘अनेक खेळाडू जखमी असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली, ही सर्वांत मोठी उपलब्धी असल्याचे मत पुजाराने व्यक्त केले.’
ऋषभ पंतला करू टार्गेट : जर्गेन्सनऑकलंड : न्यूझीलंडचे गोलंदाजी कोच शेन जर्गेन्सन यांनी डब्ल्य यूटीसी फायनलमध्ये ऋषभ पंत याला टार्गेट करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘पंत हा धोकादायक फलंदाज असून स्वत:च्या बळावर सामना फिरवू शकतो,’ असे सांगून जर्गेन्सन यांनी भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले.