केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेमध्ये फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टया बनवल्या जात नाहीत. त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजांनीच न्यूलँडच्या खेळपट्टीवर खडबडीतपणा, भेगा पडतील अशा पद्धतीने गोलंदाजी करावी जेणेकरुन रविचंद्रन अश्विनला गोलंदाजी करताना मदत मिळेल असे मत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
2010-11 सालच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात झहीर खानने अशाच पद्धतीने गोलंदाजी केल्यामुळे हरभजन सिंगला मदत मिळाली होती. उद्या पासून केप टाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. झहीर खानच्या नेतृत्वाखाली त्यावेळी वेगवान मा-याने हरभजन सिंगला गोलंदाजीसाठी पोषक ठरेल अशी खेळपट्टीची स्थिती केल्याची आठवण सचिनने सांगितली.
केपटाऊन कसोटीच्या दुस-या डावात हरभजनने सात विकेट काढल्या होत्या. इशांत शर्मा आणि श्रीसंथने राऊंड द विकेट मारा केला होता. या तिघांनी खेळपट्टी खडबडीत केल्यामुळे हरभजनला डावखु-या फलंदाजांना गोलंदाजी करताना चांगलीच मदत झाल्याची आठवण सचिनने सांगितली.
श्रीनाथला भुवनेश्वर कुमारवर विश्वास आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात कर्णधार विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारकडून गोलंदाजीची सुरुवात करावी. तो या दौ-यात भारतासाठी हुकूमी भूमिका बजावू शकतो असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. सध्याच्या घडीला भारताकडे उत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे.
मागच्या एक-दीड वर्षातील भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर भुवनेश्वर कुमार भारतीय संघासाठी स्ट्राईक बॉलर बनू शकतो असे मला वाटते. छोटया-छोटया स्पेलमध्ये त्याचा योग्य वापर करुन घ्यावा. मागच्या काही महिन्यात त्याने उत्तम प्रदर्शन केले आहे. वेगवान गोलंदाजीबरोबर दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची भुवनेश्वरकडे क्षमता आहे. दक्षिण आफ्रिकेच्या उसळी घेणा-या खेळपट्टीवर भुवनेश्वर भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल असे मत श्रीनाथने व्यक्त केले.