मुंबई : ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल (Chris Gayle) याने फॉर्ममध्ये असलेली सलामी जोडी झटपट परतल्यानंतर छोटेखानी, मात्र तुफानी खेळी करत किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या (Kings XI Punjab) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) विजयाचा पाया रचला. यासह पंजाबने यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये सलग तिसरा विजय मिळवताना प्ले ऑफच्या आशाही कायम ठेवल्या.
गेल पंजाबला एकहाती विजय मिळवून देणार असे दिसत असतानाच अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याने गेलला आपल्या पहिल्याच षटकात त्रिफळाचीत केले. परंतु, यानंतरही दिल्लीला विजय मिळवता आला नाही. असे असले तरी आता अश्विनने धोकादायक गेलला बाद करण्याचा अनोखा फॉर्म्युलाच सांगितला आहे.
धवनच्या नाबाद शतकानंतरही दिल्लीला ५ बाद १६४ धावांत रोखल्यानंतर पंजाबने विजयी लक्ष्य १९व्या षटकातंच पार केले. लोकेश राहुल-मयांक अग्रवाल ही सलामी जोडी अपयशी ठरल्यानंतर ख्रिस गेल व पूरन यांनी पंजाबच्या धावगतीला वेग दिला. गेलने १३ चेंडूंत २९ धावांचा तडाखा दिला. या जोरावर मिळालेला वेग पकडला तो पूरनने. त्याने २८ चेंडूंत ५३ धावा केल्या.
सामन्यानंतर अश्विनने गेलसोबतचा आपला फोटो ट्वीटरवर पोस्ट केला. यामध्ये अश्विन गेलच्या बुटांची लेस बांधताना दिसत आहे. या सोबत अश्विनने कॅप्शन टाकले की, ‘छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये सैतान लपलेला असतो. गोलंदाजी करण्याआधी त्याच्या दोन्ही बुटांची लेस एकमेकांसोबत बांधून टाका.’ यावर चाहत्यांनीही लाईक्सचा पाऊस पडताना कमेंट्सही केल्या आहेत.