नवी दिल्ली : आर. अश्विन हा खरंतर ऑफ स्पिनर. त्याच्या फिरकीने आतापर्यंत बऱ्याच फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. पण अश्विनने आता आपल्या भात्यामध्ये एक वेगळे अस्त्र दाखल करून घेतले असून चक्क बीसीसीआयने त्याची स्तुती केली आहे. सध्या सुरु असलेल्या एका स्थानिक सामन्यात अश्विनने ' लेग स्पिन ' टाकला आणि त्याने टाकलेल्या चेंडूचा हा व्हीडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
बुधवारी इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेचा सामना सुरु झाला. हा सामना रणजी करंडक विजेता विदर्भ आणि शेष भारत या दोन संघांमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात अश्विनने ' लेग स्पिन ' टाकला आणि त्यावर फलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने हा व्हीडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यापूर्वी विजय हजारे करंडक स्पर्धेतही अश्विनने ' लेग स्पिन ' टाकला होता. पण त्यावेळी त्याची दखल कुणी घेतली नव्हती. पण इराणी करंडक स्पर्धेत मात्र अश्विनच्या ' लेग स्पिन ' ने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.
यापूर्वीच अश्विनने याबाबत वक्तव्य केले होते. तो याविषयी म्हणाला की, " आयपीएल सुरु होण्यापूर्वी मी गोलंदाजीमध्ये काही बदल करणार आहे. त्याचबरोबर काही नवीन अस्त्रांचा समावेशही करणार आहे. गेली दहा वर्षे मी ऑफ स्पिन गोलंदाजी करत आहे. त्यामुळे आता काही तरी नवीन करायचा विचार मी केला आहे. यासाठी लक्ष्मीपती बालाजीने माझी मदत केली आहे. "