दुबई : अप्रतिम सांघिक खेळाच्या जोरावर अफगाणिस्ताननेआशिया चषक स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदवत श्रीलंकेला ९१ धावांनी नमवले. यासह लंकेचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. अफगाणिस्तानच्या २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेचा डाव ४१.२ षटकात १५८ धावांत संपुष्टात आला. शेख झायद स्टेडियमवर नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत रहमत शाहच्या (७२) जोरावर ५० षटकात सर्वबाद २४९ धावांची मजल मारली. यानंतर त्यांनी लंकेला १५८ धावांमध्ये रोखले. सलामीला लंकेला बांगलादेशने नमविल्याने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध विजय अनिवार्य होता. धावांचा पाठलाग करताना लंकेचा एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. सलामीवीर उपुल थरंगाची ६४ चेंडूतील ३ चौकारांसह केलेली ३६ धावांची खेळी सर्वाधिक ठरली. धनंजय डिसिल्वा (२३), कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (२२) व थिसारा परेरा (२८) यांनी अपयशी झुंज दिली. याशिवाय अन्य कोणीही फारवेळ तग धरु शकल नाही. मुजीब उर रेहमान, गुलबदिन नाइब, मोहम्मद नाबी व राशिद खान यांनी प्रत्येकी २ बळी घेत लंकेला खिंडार पाडले. तत्पूर्वी, रहमत शाहच्या जोरावर अफगाणिस्तानने समाधानकारक मजल मारली. मोहम्मद शहझाद (३४) व इहसानुल्लाह (४५) यांनी ५७ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. अकिला धनंजनयने शाहझादला बाद करुन ही जोडी फोडल्यानंतर रहमतने इहसानुल्लाहसह ५० धावांची भागीदारी केली. यानंतर ठराविक अंतराने अफगाण फलंदाज बाद झाले. परंतु, एका बाजूने टिकलेल्या रहमतने ९० चेंडूत ५ चौकारांसह ७२ धावा केल्या. हशमतुल्लाह शाहिदी यानेही ५२ चेंडूत २ चौकारांसह ३७ धावा केल्या. थिसारा परेराने ५५ धावांत ५ बळी घेत भेदक मारा केला. (वृत्तसंस्था)------------संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान : ५० षटकात सर्वबाद २४९ धावा (रहमत शाह ७२, इहसानुल्लाह ४५; थिसारा परेरा ५/५५) वि.वि. श्रीलंका : ४१.२ षटकात सर्वबाद १५८ धावा (उपुल थरंगा ३६, थिसारा परेरा २८; राशिद २/२६, नाइब २/२९, नाबी २/३०, रहमान २/३२.)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Asia Cup 2018 : श्रीलंकेचे आव्हान साखळीतच संपुष्टात
Asia Cup 2018 : श्रीलंकेचे आव्हान साखळीतच संपुष्टात
फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर अफगाणिस्तानने श्रीलंकेला ९१ धावांनी नमवले.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:35 AM