दुबई, आशिया चषक स्पर्धा 2018 : दुखापती या खेळाडूंच्या पाचवीला पुजलेल्या असतात. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याला प्रथम उपचार घ्यावे लागतात आणि दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झाल्यावर मैदानात उतरतो. पण बांगलादेशच्या संघातील एका खेळाडूने मात्र संघाला गरज असताना आपली दुखापत बाजूला ठेवली. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते, तरीही तो मैदानात उतरला आणि संघासाठी किल्ला लढवला. तमीम इक्बाल हे त्या जिगरबाज खेळाडूचे नाव.
तमीम बांगलादेशचा सलामीवीर आहे. पण श्रीलंकेच्या गोलंदाजीचा सामना करताना त्याला दुखापत झाली. त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले. आता तो काही मैदानात पुन्हा येत नाही, असेच साऱ्यांना वाटले. पण जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तो फलंदाजीला आला. अखेरच्या विकेटसाठी त्याने मुशफिकर रहिमबरोबर फलंदाजी केली. यावेळी तमीम एका हाताने फलंदाजी करत किल्ला लढवत होता. या खेळीत तमीम दुखापतग्रस्त अजूनही नाबाद राहिला.