दुबई, आशिया चषक 2018 : एखाद्या खेळाडूच्या वाढदिवसाला ड्रेसिंग रुममध्ये केक कापला जातो. त्याला तो भरवला जातो आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर तो फासण्यात येतो. पण मैदानात मात्र सर्वांसमोर केक कापण्याचा आणि सर्वांसमोर भरवण्याचा प्रसंग येत नाही. पण असा एक प्रसंग घडला आहे आणि तोदेखील आशिया चषक स्पर्धेच्या एका सामन्यात.
ही गोष्ट आहे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यातील. या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहझादने तुफानी फटकेबाजी करत शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्याचे हे पाचवे शतक ठरले, तर भारताविरुद्धचे त्याचे हे पहिले शतक होते. अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 252 धावांवरच आटोपला आणि सामना बरोबरीत सुटला. हे सारे तुम्हाला माहिती असेल, पण हा घडलेला प्रकार तुम्ही कदाचीत पाहिला नसेल.
शेहझाद हा शतक झळकावल्यावर यष्टीरक्षण करायला मैदानात उतरला. यावेळी यष्टीरक्षण करत असताना शेहझादला काही तरी गोड पदार्थ काढण्याचा मोह झाला. त्याने पेव्हेलियनमध्ये ही गोष्ट कळवली. त्यानंतर झालेल्या ब्रेकमध्ये अफगाणिस्तानचा एक खेळाडू मैदानात चक्क स्ट्रॉबेरी केक घेऊन आला. त्यावेळी शेहझादच्या दोन्ही हातात ग्लोव्ज होते. त्यावेळी राखीव खेळाडूने शेहझादला चक्क सर्वांसमोर केक भरवला.