दुबईः आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाकडून झालेला पराभव पचवणं बांगलादेशच्या चाहत्यांना थोडं जडच जातंय. अगदी हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेल्यानं ते सैरभैर झालेत. त्यांनी या पराभवासाठी 'थर्ड अंपायर'ला जबाबदार धरलंय. शतकवीर लिट्टन दास बाद नव्हता, पंचांनी चीटिंग केली, असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यावरून, भारतीय चाहते ट्विटरवर त्यांची शाळा घेत आहेत.
भारतानं बांगलादेशला ३ विकेट्सनी नमवून सातव्यांदा आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम केला. या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला असला, तरी बांगलादेशचा सलामीवीर लिट्टन दासनं आपल्या जिगरबाज खेळीनं क्रिकेटप्रेमींना खूश करून टाकलं. त्याच्या १२१ धावांच्या जोरावरच बांगलादेशनं २२२ धावांपर्यंत मजल मारली होती. तो मैदानावर असेपर्यंत भारतावर दबाव होता. कारण, बांगलादेश २५० पर्यंत पोहोचला असता, तर भारतासाठी विजय कठीण झाला असता. दासच्या विकेटसाठी रोहित शर्मानं बरेच प्रयोग करून पाहिले, पण तो टिच्चून खेळत राहिला. अखेर, कुलदीप यादवच्या फिरकीनं त्याला चकवलं होतं आणि 'कूल' महेंद्रसिंग धोनीनं स्टम्पिंगच्या संधीचं सोनं केलं होतं.
लिट्टन दास बाद असल्याचा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला. त्याचा पाय क्रिझ लाइनवर असल्यानं टीव्ही अंपायरलाही बऱ्याचदा फुटेज पाहावं लागलं आणि पूर्ण खात्री झाल्यानंतरच त्यांनी दासला बाद ठरवलं. नव्या नियमानुसार त्यांनी दिलेला निर्णय योग्यच आहे, पण बांगलादेशी चाहत्यांना तो मान्य नाही, पटलेला नाही.
नव्या नियमानुसार फलंदाजाच्या शरीराचा भाग किंवा बॅट क्रिझच्या आत (क्रिझ लाइनवर नाही) असेल तरच फलंदाज नाबाद असतो. परंतु, धोनीनं स्टम्पिंग केलं, तेव्हा लिट्टन दासचा पाय क्रिझ लाइनवर असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्याच आधारे पंचांनी त्याला बाद दिलं. परंतु, हा नियम बहुधा बांगलादेशी चाहत्यांना माहीत नसावा. त्यांना तो शिकवण्यासाठी भारतीय नेटिझन्स सरसावले आहेत.
बांगलादेश पराभूत झाल्यानं 'रडीचा डाव' खेळणाऱ्या चाहत्यांची सोशल मीडियावर खिल्लीही उडवली जातेय.