दुबई, आशिया चषक 2018 : दुखापती या खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. दुखापत झाल्यावर खेळाडूंची वैद्यकीय चाचणी होते. चाचणीचा अहवाल आल्यावर खेळाडूवर नेमके उपचार काय करायचे हे ठरवले जाते. दुखापत बरी झाल्यावर खेळाडूचे पुनर्वसन होते. या संपूर्ण कालावधीमध्ये खेळाडू खेळापासून लांब ठेवण्यात येते. पण एका खेळाडूला दुखापत असूनही खेळवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सध्या आशिया चषक स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा बांगलादेशसाठी महत्त्वाची आहे. कारण त्यांना एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्यांनी एका खेळाडूला दुखापत असतानाही खेळवले आणि हा निर्णय त्या खेळाडूच्या चांगलाच अंगलट आल्याचे चित्र आहे.
बांगलादेशचा संघ आता आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण क्रिकेट मंडळाच्या एका प्रतापामुळे या सामन्यात त्यांच्या एका महत्त्वाच्या खेळाडूला मुकावे लागणार आहे. शकिब अल हसनला य स्पर्धेपूर्वी दुखापत झाली होती. तो उपचार घेण्यासाठी विश्रांती घेत होता. पण क्रिकेट मंडळाने त्याला या स्पर्धेत खेळायला सांगितले आणि तो खेळला. पण आता त्याचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे आता त्याला बोटावर शस्त्रक्रीया करावी लागणार असून त्याला आता दीड महिना क्रिकेटपासून लांब रहावे लागणार आहे.