नवी दिल्ली, आशिया चषक 2018 : इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेण्याचे ठरवले. त्यामुळे आजसून सुरु होणाऱ्या आशिया चषकाच्या सामन्यात कोहली आपल्याला दिसणार नाही. कोहली संघात नसेल तर संघाचे काय होणार, अशी चिंता काही चाहत्यांनी व्यक्त केली होती. पण त्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण भारतीय संघाबरोबर एक गाईड आहे.
भारताला इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकता आली नव्हती. त्याचबरोबर कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विराटने विश्रांती घेण्याचे ठरवल्याने आशिया चषकासाठी संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. पण भारतीय संघात एक गाईड असल्यामुळे चाहत्यांनी चिंता करायचे काही कारण नसल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय संघात सर्वात अनुभवी खेळाडू आहे तो महेंद्रसिंग धोनी आणि तोच संघासाठी फ्रेंड आणि गाईड ठरत आहे. धोनीला भारताचे कर्णधारपद सोडून 18 महिने झाले, पण युवा खेळाडू अजूनही त्याच्या रणनितीचे गोडवे गातात. कोहली अटीतटीचे क्षण आल्यावर दडपणाखाली येतो, त्यावेळी धोनीच संघाला गाईड करत असल्याचे आपण साऱ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे भारताला जर आशिया चषक जिंकायचा असेल तर त्यांना धोनीचे मार्गदर्शन मोलाचे ठरू शकते.