नवी दिल्ली, Asia cup 2018 : प्रत्येक वडिल आपली स्वप्न मुलांमध्ये पाहत असतात. काही गोष्टी ज्या आपल्याला आयुष्यात जमलेल्या नाहीत, त्या आपल्या मुलाने कराव्यात, असे त्यांना वाटत असते. काही वेळा ते आपल्या मुलावर सक्तीही करतात. असंच काहीसं घडलं होतं ते आशिया चषकक्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या खलिल अहमदच्या बाबतीत.
खलिलचे वडिल एका डॉक्टरकडे कम्पाऊंडरचे काम करत होते. प्रत्येक दिवशी ते डॉक्टरांना मिळणार मान, पैसा, प्रसिद्धी हे सारे पाहत होते. त्यामुळे आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. आपल्या मुलाच्या आपण जाऊन बसावं, आपल्या मुलाचं कौतुक पाहावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी खलिलला डॉक्टर बनवण्यासाठी पैशांची जुळवाजुळवही सुरु केली होती.
खलिल लहानपणापासून चांगले क्रिकेट खेळत होता. पण त्याच्या वडिलांना क्रिकेट पसंत नव्हते. आपल्या मुलाने भरपूर अभ्यास करावा. चांगले मार्क मिळवावेत आणि डॉक्टर बनावं, असं त्यांना वाटत होतं. खलिलला मात्र डॉक्टर बनण्यात रस नव्हता. त्याला क्रिकेटपटू व्हायचं होतं. ही सारी गोष्ट खलिलने आपले प्रशिक्षक इम्तियाज यांना सांगितली. त्यानंतर इम्तियाज खलिलच्या घरी आले. इम्तियाज यांनी खलिलच्या बाबांना समजावून सांगितले आणि तुमचा मुलगा क्रिकेटमध्ये मोठ्ठं नाव करेल, असे त्यांना सांगितले. त्यानंतर खलिलच्या वडिलांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचा अट्टाहास सोडून दिला. आता आशिया चषकासाठी जेव्हा खलिलची निवड झाली तेव्हा त्याच्या वडिलांना कळून चुकले की, आपली स्वप्न मुलांवर लादायची नसतात तर त्यांना त्यांची स्वप्न साकारायला द्यायची असतात.