दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेश हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आता कोणता संघ जेतेपद पटकावणार हे शुक्रवारी समजणार असले तरी याबाबत चर्चा मात्र सुरु झाली आहे. आशिया चषकात आतापर्यंत बांगलादेशपेक्षाभारताचेच पारडे जड दिसत आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत भारताचा संघ अपराजित राहिलेला आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना भारताने पराभूत केले आहे, पण अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला बरोबरी पत्करावी लागली होती. आतापर्यंत एकूण झालेल्या आशिया चषकामध्ये भारताने 53 सामने खेळले आहेत. या 53 सामन्यांपैकी भारताने 35 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर 16 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.
बांगलादेशने पाकिस्तानवर बुधवारी विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. आत्तापर्यंतच्या आशिया चषकात बांगलादेशने 47 सामने खेळले आहेत. या 47 सामन्यांपैकी त्यांना 10 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे, तर 37 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
आतपर्यंत स्पर्धेचा इतिहास पाहिला तर बांगलादेशपेक्षा भारतच सरस ठरला आहे. त्यामुळेच अंतिम सामन्यात बांगलादेशपेक्षा भारताचेच पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.