दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पोहोचला आहे. अफगाणिस्तानबरोबरचा सामना बरोबरीत सुटला असला तरी भारतीय संघाने यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. कारण भारताने सुपर-4 या फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेशवर विजय मिळवले होते.
अंतिम फेरीसाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडेच सोपवण्यात येणार आहे. रोहितला विश्रांती मिळाली यासाठी गेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे अंतिम फेरीत रोहितचे संघात पुनरागमन होणार आहे.
रोहितबरोबर सलामीला शिखर धवन येणार आहे. कारण पाकिस्तानवरुद्धच्या सामन्यात रोहित आणि धवन यांनी दमदार सलामी दिली होती. या दोघांच्या द्विशतकी सलामीमुळे भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला होता. भारताच्या मधल्या फळीमध्ये अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश असेल. हे तिघे अनुक्रमे 3, 4, 5 या क्रमांकावर फलंदाजी करतील. त्यानंतर केदार जाधव आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना सहाव्या आणि सातव्या स्थानावर संधी देण्यात येईल.
भारत या सामन्यात चार गोलंदाजांनिशी उतरणार आहे. कारण अष्टपैलू जडेजा हा पाचव्या गोलंदाजाची भूमिकाचोख बजावत आहे. त्याचबरोबर केदारही उपयुक्त गोलंदाजी करत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना स्थान देण्यात येईल. त्याचबरोबर गोलंदाजीची सुरुवात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांच्याकडून होणार आहे.