दुबई, आशिया चषक 2018: बांगलादेशविरुद्धच्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारताचा रवींद्र जडेजा चांगलाच भटकलेला पाहायला मिळाला. बांगलादेशच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली. भारताला विकेट मिळवण्यात अपयश येत होते. त्यामध्येच असा एक प्रकार मैदानात घडला की जडेजा चांगलाच भडकला.
भारताविरुद्धच्या अंतिम फेरीत बांगलादेशच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. यामध्ये पुढे होता तो लिटॉन दास. भारताच्या गोलंदाजांचा दासने चांगलाच समाचार घेतला आणि एक नवा विक्रम बनवला. आतापर्यंत दासची 41 ही सर्वोत्तम धावसंख्या होती. दासने भारताविरुद्ध आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. 41 धावांवर असताना खणखणीत चौकार लगावत दासने आपली आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या गाठली.
दासने चौकारानानिशी आपले पहिले एकदिवसीय अर्धशतकही साजरे केले. अर्धशतक पूर्ण करताना त्याने जडेजाच्या दहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केला. पण याच षटकात त्याला बाद करण्याची संधी भारताला होती.
अर्धशतक झळकावल्यावर एक चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जडेजाला मोठा फटका मारण्याचा नादात दासचा झेल उडाला. हा झेल टिपण्यासाठी युजवेंद्र चहल सरसावला. पण उंच उडालेला झेल चहलला मात्र टिपता आला नाही. त्यावेळी जडेजा चहलवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.