दुबई, आशिया चषक 2018: भारताविरुद्धच्या अंतिम फेरीत बांगलादेशच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. बांगलादेशच्या सलामीवीरांनी शंभरी ओलांडली, तरीही भारताला एक विकेट मिळत नव्हती. कर्णधार रोहित शर्माने पाचही गोलंदाज वापरून पाहिले, पण त्याला काही यश मिळत नव्हते. पण अखेर रोहितने एक जुगाड केला आणि भारताला पहिले यश मिळाले.
बांगलादेशच्या सलामीवीरांना रोखायचे होते. पण भारताचे पाचही गोलंदाज त्यामध्ये अपयशी ठरत होते. आता नेमके करायचे काय, हा यक्षप्रश्न रोहितसमोर होता. रोहितने थोडा विचार केला आणि एक प्रयोग करायचे ठरवले.
रोहितने आपल्या पाचही गोलंदाजांना बाजूला सारले आणि केदार जाधवच्या हाती चेंडू सुपूर्द केला. केदारने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. कारण आपल्या पहिल्याच षटकात त्याने सलामीवीर मेहदी हसनला अंबाती रायुडूकरवी झेलबाद केले आणि बांगलादेशला पहिला धक्का दिला.