दुबई, आशिया चषक 2018: एकेकाळी भारतीय संघ हा अन्य संघांना विक्रम करू देण्यासाठीच प्रसिद्ध होता. कोणताही नवखा संघ आला तरी ते भारताविरुद्ध काही तरी विक्रम करायचे. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाणे कमी झाले होते. पण आशिया चषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशच्या फलंदाजाने भारताविरुद्ध आपला नवा विक्रम प्रस्थापित केला.
भारताविरुद्धच्या अंतिम फेरीत बांगलादेशच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. यामध्ये पुढे होता तो लिटॉन दास. भारताच्या गोलंदाजांचा दासने चांगलाच समाचार घेतला आणि एक नवा विक्रम बनवला.
दासच्या नावावर आतापर्यंत 17 सामने आहेत. या 17 सामन्यांमध्ये त्याने 14.06च्या सरासरीने 225 धावा केल्या होत्या. आतापर्यंत दासची 41 ही सर्वोत्तम धावसंख्या होती. ही सर्वोच्च धावसंख्या त्याने आशियाच चषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केली होती. पण दासने भारताविरुद्ध आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. 41 धावांवर असताना खणखणीत चौकार लगावत दासने आपली आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या गाठली. दासने या खेळीत आपले पहिले अर्धशतकही चौकाराच्या जोरावर साजरे केले.