दुबई, आशिया चषक : भारतीय संघाने बुधवारी आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहज नमवले. सलग दुसऱ्या दिवशी सामना खेळूनही भारतीय खेळाडू थकले नव्हते. ताज्या दमाने त्यांनी खेळ केला आणि पाकिस्तानवर आठ विकेट राखून विजय मिळवला. पण हे दोन प्रतिस्पर्धी आणखी एकदा समोरासमोर येणार आहेत आणि क्रिकेट चाहत्यांना आणखे एका दर्जेदार खेळाचा आस्वाद लुटता येणार आहे.
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 162 धावा करता आल्या. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी यावेळी प्रत्येकी तीन बळी मिळवले. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करत रोहित शर्माने अर्धशतक झळकावत विजयात मोलाची भूमिका बजावली. रोहितने 39 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या. शिखर धवनने 46 धावा करत रोहितला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी नाबाद 31 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
( India vs Pakistan : भारतापुढे पाकिस्तानचं लोटांगण; भुवनेश्वर कुमार सामनावीर )
हॉंगकॉंगच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सुपर फोर गटाचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान ही लढत केवळ औपचारिकता होती. अ गटातून भारत आणि पाकिस्तान, ब गटातून बांगलादेश व अफगाणिस्तान यांचा सुपर फोर गटात प्रवेश निश्चित होता. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक लढत होणार हेही पक्के होते. बुधवारच्या लढतीनंतर केवळ तिची तारीख जाहीर करण्यात आली. सुपर फोर गटात प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असून अव्वल दोन संघ अंतिम फेरीत धडक मारतील. या गटात भारताचा पहिला सामना बांगलादेशशी २१ सप्टेंबरला होणार आहे. त्याचदिवशी पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात लढत होईल.