दुबई : आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात प्रमुख जखमी खेळाडूंच्या अनुपस्थितीत कमकुवत झालेल्या बांगलादेशविरुद्ध दमदार विजय नोंदवून उपखंडात आपणच ‘बादशाह’ आहोत हे सिद्ध करण्याची संधी असेल.बांगलादेशला कुठल्याही स्तरावर कमकुवत मानता येणार नाही. बुधवारी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत या संघाने ३७ धावांनी नमवून पाकिस्तानला ‘ पॅकअप’ करायला लावले होते. दुसरीकडे कागदावर तरी सातव्यांदा विक्रमी भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. बांगलादेशलाही यावेळी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची आशा आहे.भारत-बांगलादेश यांच्यातील चुरस जुनीच आहे. तथापि फायनलपूर्वी प्रमुख खेळाडूंचे जखमी होणे बांगलादेशसाठी निराशादायी आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया चषक जिंकणे भारतासाठी मात्र मोठे यश ठरेल. अफगाणिस्तानविरुद्ध ‘टाय’ झालेल्या सुपरफोर सामन्यात भारताने नियमित खेळाडूंना विश्रांती दिली होती. बांगलादेशविरुद्ध मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला येतील. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल हे गोलंदाजीला बळकटी देतील. रोहितने २६९ तसेच धवनने ३२७ धावा ठोकून स्पर्धेत चांगली भूमिका वठविली, पण मधल्याफळीचे अपयश कायम आहे. अंबाती रायुडूने सर्वच सामन्यात चांगली सुरुवात केली पण तो मोठी खेळी करू शकला नाही. केदार जाधव आणि धोनी हे मात्र मधल्या षटकात अडखळले. धावांचा पाठलाग करताना धोनी सर्व सामन्यात अपयशी ठरला. या सामन्यात धोनी चौथ्या स्थानावर खेळून मोठ्या धावा काढण्याची आशा आहे.दुसरीकडे, बांगलादेशची गोलंदाजी एकदिवसीय क्रिकेटसाठी फार चांगली आहे. वेगवान मुस्तफिजूर रहमान, रूबेल हुसेन, मशरफी मूर्तझा हे कुठल्याही फलंदाजाची परीक्षा घेऊ शकतात. फलंदाजीत मुशफिकूर रहीम याच्या खांद्यावर धावा काढण्याची प्रमुख जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)
अंतिम सामान्यातील प्रतिस्पर्धी संघभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडु, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल आणि दीपक चाहर.बांगलादेश : मशरफी मूर्तझा (कर्णधार), मोहम्मद मिथून, लिट्टन कुमार दास, मुशफिकूर रहीम, अरुफूल हक, महमुदुल्लाह, मोसद्देक हुसेन, नजमूल हुसैन शानो, मेहदी हसन मिराज, नजमूल इस्लाम अपू, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान, अबू हैदर रोनी, सौम्या सरकार, मोमिनूल हक, इमुरूल कायेस .सामना : सायंकाळी ५ वाजल्यापासूनफलंदाजी, गोलंदाजी सुधारण्याची गरज - मूर्तझाअबुधाबी : ‘भारताविरुद्ध अंतिम सामन्यात आव्हान सादर करायचे झाल्यास आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करावीच लागेल,’ असे बांगलादेशचा कर्णधार मशरफी मूर्तझा याने म्हटले.तो म्हणाला,‘भारत बलाढ्य संघ असल्याची आम्हाला जाणीव आहे. जगातील अव्वल संघाविरुद्ध आम्हाला फलंदाजी-गोलंदाजीत सुधारणा हवी आहे. आम्हाला शाकिब आणि तमीम यांची उणीव जाणवेल. पण अन्य खेळाडूही कमी नाहीत. त्यांनी शंभर टक्के योगदान दिल्यामुळेच अंतिम फेरीत पोहोचलो आहोत. आता एक सामना जिंकून चॅम्पियन होण्याची वेळ असल्याने सर्व सहकारी दमदार खेळ करतील, यात शंका नाही.’पाकिस्तानवरील विजयाबद्दल मूर्तझा म्हणाला, ‘आम्ही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्यानंतरही गोलंदाजांनी स्वत:ची जबाबदारी चोखपणे जबावल्यामुळेच विजय साकार झाला. आम्ही गोलंदाजीत डावपेच बदलले होते. याशिवाय मुशफिकूर रहीम आणि मोहम्मद मिथुन यांची फटकेबाजी सुरेख ठरली.’ (वृत्तसंस्था)