मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) बुधवारी आशिया चषक (Asia Cup 2018) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची तारीख वगळता या नवे असे काहीच नव्हते. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच क्रिकेटप्रेमींनी भारत-पाक सामन्यांच्या तारखेची नोंद करून घेतली. मात्र, या लढतीत भारतीय संघाला विश्रांती न करताच मैदानात उतरावे लागणार आहे. भारताला 18 व 19 सप्टेंबर असे सलग दोन दिवस सामने खेळावे लागणार आहेत. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने या वेळापत्रकावरून आयसीसीला धारेवर धरले. अशा वेळापत्रकानुसार भारतीय संघ आशिया चषक जिंकू शकत नाही, असे वक्तव्य त्याने केले.
माजी कसोटीपटू सेहवाग एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "वेळापत्रक पाहून मला धक्काच बसला. वर्तमान काळात कोणता संघ सलग सामने खेळतो? इंग्लंड दौ-यावर टी-20 सामन्यांमध्ये दोन दिवसांचा गॅप होता आणि येथे दुबईत आग ओकणा-या उन्हात सलग दोन वन डे सामने खेळावे लागणार आहेत. त्यामुळे हे योग्य वेळापत्रक आहे असे मला नाही वाटत."
(Asia Cup 2018: 'थकलेल्या' टीम इंडियाला करावा लागणार पाकिस्तानचा सामना; वेळापत्रकाचा घोळ)
त्याने पुढे बीसीसीआयला यात लक्ष घालण्यास सांगितले. तो म्हणाला, " एसेक्सविरूद्धचा चार दिवसांचा सामना तीन दिवसांवर आणण्यापेक्षा बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेतील वेळापत्रकावर लक्ष द्यायला हवे. एका वन डे सामन्यानंतर खेळाडूंना 48 तासांच्या विश्रांतीची गरज असते. हे खेळाडू जवळपास साडेपाच तास मैदानावर खेळतात. सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये प्रचंड गरमी असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू सलग दुस-या सामन्यात थकलेले असतील. हे वेळापत्रक असेच राहिले, तर भारतीय संघाचे जेतेपद पटकावण्याची शक्यता कमीच समजा.
दुबईत 15 ते 28 सप्टेंबर या कालावधीत होणा-या स्पर्धेचा पहिला सामना बांगलादेश विरूद्ध श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून एक संघ मुख्य फेरीत येणार आहे आणि त्याचा रकाणा रिक्त ठेवण्यात आला आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी सहभाग निश्चित केला आहे. संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँगकाँग यांच्यापैकी एक संघ मुख्य फेरीत प्रवेश करणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे संघ 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेवटचे भिडले होते.