दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध अफगाणिस्तान : महेंद्रसिंग धोनी हा किती चतुर कर्णधार आहे, हे पुन्हा एकदा अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. धोनी हा संघाचे नेतृत्त्व करत असताना असे काही क्षेत्ररक्षण रचतो, की ते बाकीच्या लोकांना समजण्यापलीकडचे असते. या सामन्यातही अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली.
अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहझाद हा धडाकेबाज फलंदाजी करत होता. त्यावेळी अन्य फलंदाजांना बाद करण्याची रणनीती धोनीने अवलंबली. धोनीची ही रणनीती यशस्वीही ठरली. कारण रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. त्यावेळीच धोनीची चतुराई पाहायला मिळाली.
कुलदीप गोलंदाजी करत असताना धोनीने जे क्षेत्ररक्षण लावले, ते कुणालाच कळत नव्हते. पण या गोष्टीचा फायदा मात्र झाला. धोनीने कुलदीप गोलंदाजी करत असताना दोन स्लीप आणि दोन लेग स्लीप लावल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त धोनीच असे क्षेत्ररक्षण उभारू शकतो, असे चाहते यावेळी म्हणत होते.