दुबई, आशिया चषक 2018: आशियाच चषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना दणक्यात सुरुवात केली. सलामीवीर लिटन दासने तर भारताच्या गोलंदाजीची पिसे काढत शतक झळकावलं. पण पुन्हा एकदा भारतासाठी महेंद्रसिंग धोनीची चतुराई कामी आली आणि संघाने सुस्कारा सोडला.
लिटन दासने वन डेतील पहिले शतक झळकावताना बांगलादेशला 29 षटकांत 4 बाद 145 धावांची मजल मारून दिली. मात्र महमदुल्लाहही बाद झाला. बांगलादेशच्या 35 षटकांत 5 बाद 160 धावा केल्या आहेत. दासने 117 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारांसह 121 धावा केल्या.
दास आता भारतासाठी कर्दनकाळ ठरेल असे वाटत होते. पण धोनीने यावेळी मात्र संघाला दिलासा दिला. कुलदीप यादवच्या 41व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर धोनीने दासला यष्टीचीत केले. हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला होता. धोनीने एवढ्या सफाईदारपणे आपले काम केले होते की तिसऱ्या पंचांनाही अखेर दासला बाद घोषित करावे लागले. त्यापूर्वी मोहम्मद मिथूनही धोनीच्या चतुराईमुळे धावचीत झाला होता. रवींद्र जडेजाने जेव्हा फटका अडवला तेव्हा त्याला चेंडू नेमका कुठे फेकायचा हे समजत नव्हतं. त्यावेळी धोनीने जडेजाला चहलकडे चेंडू फेकायला सांगितला आणि मिथून धावबाद झाला.