नवी दिल्ली, आशिया चषक २०१८ : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची ताकद किंचित कमी झाली असली तरी जेतेपद कायम राखण्यास रोहित शर्मा समर्थ आहे, असा विश्वास माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर विराटला विश्रांती देण्यात आली असल्याने तो आशिया चषक स्पर्धेत खेळणार नाही. या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात मनिष पांडे, केदार जाधव आणि अंबाती रायडू हे तडाखेबंद खेळी करणारे फलंदाज आहेत. या स्पर्धेत ३७ वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर संथ खेळीमुळे धोनीवर टीका झाली होती. " इंग्लंड दौऱ्यात भारताला चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघ अजूनही बलाढ्य आहे. विराटसह संघाची ताकद अजून वाढते, परंतु कर्णधार म्हणून रोहितची आकडेवारी चांगली आहे. त्यामुळे तोही चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे. आशिया चषक जिंकण्यासाठी संघ समर्थ आहे," असे गांगुली म्हणाला.
आशिया चषक स्पर्धेत भारत सर्वात यशस्वी संघ आहे. १३ मोसमात भारतीय संघाने ६ जेतेपदे जिंकली आहेत. २०१६ मध्ये ही स्पर्धा ट्वेंटी-२० प्रकारात खेळवली गेली आणि त्यात भारताने बाजी मारली. भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५ आणि २०१० मध्ये जेतेपद पटकावले आहे. भारताचा पहिला सामना १८ सप्टेंबरला हॉंगकॉंगविरुद्ध होणार आहे.