दुबई, आशिया चषक 2018 : इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरलेल्या शिखर धवनची बॅट आशिया चषक स्पर्धेत चांगलीच तळपत आहे. भारताच्या सलामीवीराने चार सामन्यांत दोन शतकांसह सर्वाधिक 327 धावा केल्या आहेत. भारताचा हा 'गब्बर' आज जेतेपदाच्या लढतीत बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी सज्ज आहे. अंतिम लढतीत मोठी खेळी साकारून त्याला श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याचा आशिया चषक स्पर्धेतील विक्रम मोडण्याची संधी आहे.
धवनने चार सामन्यांत अनुक्रमे 127, 46, 40 आणि 114 अशा धावा केल्या आहेत. सुपर फोर गटातील अखेरच्या लढतीत अफगाणिस्तानविरुद्ध त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, बांगलादेशविरुद्ध अंतिम लढतीत धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. अंतिम लढतीत धवन 52 धावा करण्यात यशस्वी होतो, तर त्याच्या नावावर आशिया चषक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला जाईल.
श्रीलंकेच्या जयसूर्याने 2008च्या आशिया चषक स्पर्धेत एकूण 378 धावा केल्या होत्या. धवनच्या नावावर सध्या 327 धावा आहेत आणि त्याने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनीने 2008 मध्ये 327 धावा केल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे 2008 मध्येच सुरेश रैनाने 372 धावा केल्या होत्या. आशिया चषक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली ( 357), वीरेंद्र सेहवाग ( 348) आणि कुमार संगकारा ( 345) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.