मुंबई - विराट कोहली हा भारतीयक्रिकेट संघाचा एकहाती तंबू, अशी सध्याची परिस्थिती आहे. अनेकदा फलंदाजीचा संपूर्ण भार विराटनेच उचललेला पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतही विराटच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडताना पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. कारण आशिया स्पर्धेत विराटला विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुखापतीमुळे विराटला अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातही विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटला फिटनेस टेस्टही द्यावी लागली होती. इंग्लंड दौऱ्यात तो प्रत्येक सामना खेळला आहे. त्यात ट्वेंटी-२० आणि वन डे सामन्यांचाही समावेश आहे. सततच्या क्रिकेटमुळे त्याची दुखापत बळावू शकते आणि आगामी महत्त्वाच्या मालिका लक्षात घेता त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील भारत - पाकिस्तान सानमा विराटशिवाय होण्याची शक्यता बळावली आहे.
विराट व्यतिरिक्त हार्दिक पांड्यालाही विश्रांती मिळू शकते. २४ वर्षीय पांड्या सातत्याने संघासोबत खेळत आहे आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. त्यामुळे मयांक अग्रवाल आणि मनिष पांडे यांना संघात स्थान मिळू शकते.