दुबई, आशिया चषक 2018 : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगानेआशिया चषक स्पर्धेत जोरदार कमबॅक केले आहे. पहिल्याच षटकात त्याने बांगलादेशच्या दोन फलंदाजांना बाद करत संघाला दमदार सुरुवात करून दिली.
बऱ्याच कालावधीनंतर मलिंगाला चाहत्यांनी श्रीलंकेच्या संघात पाहिले. मलिंगानेही यावेळी आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने सलामीवीर लिटन दासला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले आणि बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्यानंतरच्याच चेंडूवर मलिंगाने बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू शकिब अल हसनला त्रिफळाचीत केले.
पहिल्या षटकात अखेरच्या दोन चेंडूंवर दोन बळी मिळवल्याने मलिंगा हॅट्ट्रिकवर होता. पण त्याच्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मुशफिकर रहिमने खेळून काढला आणि मलिंगाची हॅट्ट्रिक हुकली.