दुबई, आशिया चषक स्पर्धा 2018 : आशिया चषक स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली. पहिला सामना बांगालादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळवला गेला. हा सामना बांगलादेशने जिंकला असला तरी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या सामन्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वाधिक बळी मिळवण्याचा मान मलिंगाने या सामन्यात पटकावला आहे.
मलिंगाने जवळपास एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या सामन्याच्या पहिल्याच षटकात मलिंगाने आपले अचूक मारा केला आणि बांगलादेशच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. मलिंगाने या सामन्यात एकूण चार बळी मिळवले आणि सर्वाधिक बळींची नोंद केली.
आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने आतापर्यंत 30 बळी मिळवण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम मलिंगाने मोडीत काढला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चार बळी मिळवत मलिंगाने आशिया चषक स्पर्धेत एकूण 32 बळींची नोंद केली आहे.