दुबई, आशिया चषक 2018 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेआशिया चषक स्पर्धेत एक विक्रम खुणावत आहे. त्याला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या दिग्गजांच्या पंगतीत बसण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला केवळ 95 धावा कराव्या लागणार आहेत. या धावा करताच तो वन डे क्रिकेटमध्ये 10000 धावांचा पल्ला गाठेल आणि तेंडुलकर, द्रविड व गांगुली यांच्यानंतर हा पल्ला गाठणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल.
आशिया चषक स्पर्धेत धोनीने पुन्हा एकदा आपल्या कल्पक नेतृत्वाने सर्वांची वाहवा मिळवली. मंगळवारी भारत सुपर फोर गटाच्या अखेरच्या लढतीत अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. त्यानंतर शुक्रवारी जेतेपदाच्या लढतीत भारत मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतच धोनी 10000 धावांचा पल्ला पार करेल का, याची उत्सुकता लागली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघेच भारताला विजय मिळवून देत आहेत. त्यामुळे धोनीला फलंदाजीची संधी मिळेल का, हेही महत्त्वाचे आहे.
भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 463 सामन्यांत 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. त्यानंतर माजी कर्णधार गांगुली 308 सामन्यांत 11221 आणि द्रविड 340 सामन्यांत 10768 धावांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. धोनीने 322 सामन्यांत 9905 धावा केल्या आहेत आणि त्याला 10000 धावांसाठी केवळ 95 धावांची गरज आहे. विराट कोहली 211 सामन्यांत 9779 धावांसह पाचव्या स्थानी आहे.