दुबई, आशिया चषक 2018 : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपद देण्यात आले होते. हा सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला आणि बरोबरीत सुटला. पण तरीही धोनीच्या नावावर एक विक्रम जमा झाला आहे.
कर्णधार म्हणून धोनीचा हा 200वा सामना होता. यापूर्वी दोनशेपेक्षा जास्त सामन्यांत देशांचे कर्णधारपद भूषवण्याचा मान मिळवणारा तो तिसरा कर्णधार ठरला होता. या स्पर्धेसाठी रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली असली तरी या सामन्यात मात्र संघाचे नेतृत्त्व धोनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. कारण भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि धोनीकडे संघाची कमान सोपवण्यात आली.
आतापर्यंत सर्वात जास्त सामने बरोबरीत सोडवणारा कर्णधार म्हणून आता धोनीची ओळख निर्माण झाली आहे. कारण धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने पाचव्यांदा सामना बरोबरी सोडवला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ आणि शॉन पॉलक यांच्या नेतृत्त्वाखाली तीन वेळा सामने बरोबरीत सुटले आहेत.