दुबई, आशिया चषक 2018 : अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शेहझादने भारताविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली आणि साऱ्यांचीच मने जिंकली. शेहझादची भारताविरुद्धची ही सर्वोत्तम खेळी ठरली. पण शेहझादबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल. एकदा शेहझादने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर एक भलताच प्रकार घडला होता.
भारताविरुद्ध शेहझादने 124 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. जेव्हा संघाच्या 131 धावा झाल्या होत्या, त्यामध्ये फक्त शेहझादच्या 103 धावा होत्या. ज्या तडफदारपणे शेहझादने फटकेबाजी केली ते पाहून साऱ्यांनीच त्याचे कौतुक केले. पण शेहझादच्या नावावर एक बट्टा लागलेला आहे. शेहझाद फटकेबाजी करत होता तेव्हा त्याच्या वजनाची चर्चा होत होती.
शेहझादनेही आपले वजन कमी करण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला होता. वजन कमी करण्यासाठी त्याने काही सप्लीमेंट्स घेतल्या होत्या. या सप्लीमेंट्स त्याने वैद्यकीय चाचणी करून घेतल्या नव्हत्या. या सप्लीमेंट्समध्ये काही अशी द्रव्य होती जी एका खेळाडूने सेवन करणे योग्य नाही. या सप्लीमेंट्समध्ये काही उत्तेजर द्रव्य होती. त्यानंतर जेव्हा शेहझादची उत्तेजक द्रव्याची चाचणी घेण्यात आली, त्यावेळी तो या चाचणीत दोषी आढळला होता. त्यामुळेच त्याच्यावर 2017 साली एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले. त्यानंतर आता 2018 साली त्याने संघामध्ये पुनरागमन केले.