दुबई, आशिया चषक स्पर्धा 2018 : आशिया चषकातील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्याच लढतीत बांगलादेशच्या मुशफिकर रहिमने झुंजार शतकी खेळी साकारली. त्याच्या या शतकाच्या जोरावर बांगलादेशला 261 धावा करता आल्या आणि श्रीलंकेवर विजय मिळवता आला. या सामन्यात शतक झळकावत मुशफिकरने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
बांगलादेशकडून सर्वाधिक सरासरी असलेला मुशफिकर हा पहिला फलंदाज ठरला आहे. या शतकानंतर मुशफिकरची सरासरी 55.17 एवढी आहे. मुशफिकरने यावेळी तमीम इक्बालला मागे टाकले आहे. कारण तमीमची सरासरी 54.82 एवढी आहे.
बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता मुशफिकरने दुसरे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मुशफिकरने 144 धावांची जिगरबाज खेळी साकारली होती. ही खेळी बांगलादेशसाठी दुसरी सर्वाधिक धावांची खेळी ठरली आहे. बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तमीमच्या नावावर आहे. तमीमने 2009 साली झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 154 धावांची खेळी साकारली होती.
मुशफिकरने स्वत:चे काही विक्रम या सामन्यात मोडीत काढले आहेत. मुशफिकरची ही आतापर्यंतची सर्वाधिक धावांची खेळी ठरली आहे. यापूर्वी मुशफिकरने भारताविरुद्ध 117 धावांची खेळी साकारली होती.