नवी दिल्ली, आशिया चषक 2018: भारतीय संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होणार आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला पाकिस्तानच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. या स्पर्धेत भारतीय संघ बाजी मारेल असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना वाटत असला तर महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान आशिया चषक जिंकेल, असे भाकित केले आहे.
संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेलॉ कॉलममध्ये गावस्कर यांनी पाकिस्तान जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले की,'' आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यांचा संघ समतोल आहे. शिवाय ते त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत. त्यामुळे येथील खेळपट्टी व वातावरणाची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे आपल्या खात्यात आशिया चषक जमा करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.''
ते पुढे म्हणाले की,'' पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान हे माजी क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना आशिया चषकाची विजयी भेट देण्याचा संघाचा निर्धार असेल. दुसरीकडे कर्णधार दिनेश चंडिमलच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा संघ कमकुवत झाला आहे. बांगलादेशचा संघ शकिब अल हसनच्या भवतीच फिरत आहे. श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांत अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. गोलंदाजीत मात्र त्यांची बाजू कमकुवत आहे."
Web Title: Asia Cup 2018: Pakistan will win Asia cup, Sunil Gavaskar predicted
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.