दुबई- इमाम उल हक आणि बाबर आझम यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने सुपर फोर गटात विजयी सलामी दिली. त्यांनी अफगाणिस्तानवर 3 विकेट राखून विजय मिळवला. माजी कर्णधार शोएब मलिकने चिवट खेळ करताना विजयी कळस चढवला. पण या विजयासाठी अफगाणिस्तानने त्यांना चांगलेच झुंजवले. हशमतुल्लाह शाहिदी ( नाबाद 97) आणि कर्णधार असघर अफघान (67) यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर गटात पाकिस्तानसमोर विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य ठेवले. अफगाणिस्तानने 50 षटकांत 6 बाद 257 धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान शून्यावर बाद झाला. त्यानंतर इमाम उल हक आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. इमामने १०४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ८०, तर बाबरने ९४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ६६ धावा केल्या.
चार धावांच्या फरकाने हे दोन्ही खेळाडू माघारी फिरले आणि सुस्थितीत असलेला पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. सहाहून अधिक सरासरीने त्यांना लक्ष्याचा पाठलाग करण्यास भाग पडले. माजी कर्णधार शोएब मलिक आणि हासिर सोहेलने चेंडू व धावा यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केले. पण सोहेल १३ धावांवर बाद झाला. मात्र शोएबने संयमी खेळ करून विजयाचा कळस चढवला.