दुबई, आशिया चषक 2018: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणांची नेहमी उदाहरण दिली जातात, परंतु या दोन देशांमध्ये असे अनेक भावनिक नातं जोडणारे प्रसंग घडलेले पाहायला मिळाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तानच्या खेळाडूप्रती दाखवलेला आदर, हे ताजे उदाहरण. त्यात आज होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीपूर्वी मनाला भावणारा प्रसंग समोर आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा पाठीराखा सुधीर गौतम याच्या मदतीला पाकिस्तानचे 'चाचा' धावून आले आहेत.
(Asia Cup 2018: भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमधील ठसन, मैदानावर रंगला 'राडा')
भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी जगभर फिरणारा सुधीर आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला. पण, आर्थिक चणचण भासल्यामुळे त्याला ही स्पर्धेसाठी युएईत दाखल होऊ शकत नव्हता. मात्र, शेजारील राष्ट्रातून त्याला मदतीचा हात आला. पाकिस्तान क्रिकेट संघाचे कट्टर चाहते बशीर चाचा ( चाचा शिकागो) यांनी सुधीरला मदत केली. त्यांनी सुधीरचा संपूर्ण युएई दौरा स्पॉन्सर केला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या लढतीत सुधीर तिरंगा घेऊन रोहित शर्माच्या संघाला चिअर करताना दिसणार आहे.
(Asia Cup 2018 : विश्वविजेत्या मेरी कोमलाही भारत-पाक लढतीची उत्सुकता; निवडला 'फेव्हरिट' संघ )
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा जबरा फॅन असलेला सुधीरला युएई दौऱ्यासाठी प्रायोजक मिळाला नव्हता. सर्व आशा संपल्यानंतर तेंडुलकरच्या या चाहत्याला पाकिस्तानच्या बशीर चाचा यांनी कॉल केला. या दौऱ्यातील सुधीरचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठीचा तो कॉल होता. तेव्हा सुधीरने अडचण सांगितली आणि चाचांनी त्वरित त्याचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.
(Asia cup 2018 : रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध विक्रमाची संधी, विराटला मागे सोडणार)
''हे मी प्रेमापायी केले आहे. पैसा येतो आणि जातो, पण आपले प्रेम कायम राहते. सुधीर युएईत दाखल झाला आहे आणि त्याची सर्व काळजी आम्ही घेत आहोत. मी गर्भश्रीमंत नाही, परंतु माझे मनं मोठ आहे. त्याला मदत केल्याने अल्लालाही आनंद झाला असेल,'' असे बशीर चाचा यांनी सांगितले.