मुंबई, आशिया चषक 2018 : विराट कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्मा आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. भारतीय संघाची सलामीची लढत 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होणार आहे आणि त्यानंतर 19 तारखेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पाहायला मिळेल. विराटच्या अनुपस्थितीत सर्वांच्या नजरा रोहितवर खिळल्या आहेत.
रोहित प्रथमच भारतीय संघाची धुरा सांभाळत नसून त्याने 2017 मध्ये पहिल्यांदा ही जबाबदारी खांद्यावर घेतली होती. 2017च्या श्रीलंका दौऱ्यात विराटच्या अनुपस्थितीत रोहितने कर्णधारपद भुषविले होते. भारताने रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये वन डे आणि टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. 2018 मध्ये निदाहास चषक स्पर्धेतही कर्णधार रोहितने भारताला जेतेपद जिंकून दिले होते. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत रोहिता जेतेपदाचा चौकार लगावेल का, याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे.