दुबई, आशिया चषक 2018: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत विजयाने सुरूवात केली असली तरी संघाची एकूण कामगिरी चिंताजनक होती. शिखर धवन, अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांनी दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध दमदार खेळी करून आपला फॉर्म परत मिळवला, परंतु अन्य फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पण, त्यापलिकडे गोलंदाजांचे अपयश ही भारतासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. हाँगकाँगच्या निजाकत खान आणि कर्णधार अंशुमन रथ या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा ज्या संयमाने सामना केला, ते कौतुकास्पद होते. या दोघांनी कसोटी दर्जा असलेल्या संघाविरुद्ध सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम नोंदवला. आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताच एक विक्रम नोंदवला गेला. पण, खेळात सातत्य राखताना खान व रथ यांनी हाँगकाँगसाठी पहिल्या विकेटच्या (174 धावा) सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही नोंदवला. यापूर्वी अंशुमन रथ आणि जेम्स जॉन अॅटकिसन यांनी पपुआ अँड गिनीविरुद्ध 84 धावांची भागीदारी केली होती. पहिल्या विकेटसाठीचा हा विक्रम आज भारताविरुद्ध मोडला गेला. आशिया चषक स्पर्धेत विजयाची पाटी कोरी असलेल्या हाँगकाँगला 2018च्या सलामीच्या लढतीत दहा फलंदाजांना मिळून 116 धावा करता आल्या होत्या. त्याच हाँगकाँगच्या सलामीवीरांनी भारताविरुद्ध 174 धावांची भागीदारी केली. भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर आणि खलील अहमद या जलदगती गोलंदाजांबरोबर कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि केदार जाधव या फिरकी गोलंदाजांनाही ही सलामीची जोडी फोडण्यासाठी एकूण 34.1 षटकं टाकावी लागली. हाँगकाँगच्या सलामीवीरांच्या या चिवट खेळीने रोहित शर्माच्या नेतृत्व कौशल्याचा कस पाहिला. पहिल्या सामन्यातील या चुका पाहिल्यानंतर रोहित शर्माला एक प्रश्न विचारावा वाटतो आणि तो म्हणजे रोहित भाऊ, आपण पाकिस्तानविरुद्ध असं जिंकणार का?