दुबई, आशिया चषक २०१८: हाँगकाँगविरुद्ध पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने २८५ धावा उभ्या केल्या खऱ्या, परंतु त्याचा बचाव करताना भारतीय संघाची दमछाक झाली. भारताने स्पर्धेत विजयी सलामी देण्यात यश मिळवले. या विजयामुळे भारतीय खेळाडूंना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला आहे. आज होणाऱ्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला एक विक्रम खुणावत आहे.
( Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला पाकिस्तान एवढा का घाबरतो, जाणून घ्या )
हाँगकाँगविरुद्धच्या लढतीत रोहितला २३ धावा करता आल्या. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला विक्रमाची संधी आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. हाँगकाँग सारख्या दुबळ्या प्रतिस्पर्धीसमोर रोहितच्या नेतृत्वाची कसोटी लागली. भारताने हा सामना 26 धावांनी जिंकला. त्यामुळे पाकिस्तानचा सामना करण्यासाठी रोहितला बळ मिळाले आहे.
( Asia Cup 2018: रोहित भाऊ, आपण पाकिस्तानविरुद्ध असं जिंकणार का? )
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांत २०६ धावा केल्या आहेत. त्यात १८३ धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. विराटचा हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला अवघ्या तीन धावांची आवश्यकता आहे. त्याच्या नावावर पाच सामन्यांत २०४ धावा आहेत. त्याची ६८ धावांची सर्वोत्तम खेळी आहे. या क्रमवारीत महेंद्रसिंग धोनी १६२ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (१७९) तिसऱ्या स्थानावर आहे.