मुंबई, आशिया चषक 2018 : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली बाजी मारली. गतविजेत्या भारताने आपल्याकडेच आशिया चषक कायम राखला. आशिया चषक पटकावणारा रोहित हा तिसरा मुंबईकर कर्णधार ठरला आहे.
भारताने आतापर्यंत सातव्यांदा आशिया चषकाचे जेतेपद पटकावले आहे. भारताने पहिल्यांदा 1984 साली पहिल्यांदा जेतेपद पटकावले होते. तेव्हा भारताचे कर्णधार होते सुनील गावस्कर. 1984 हे आशिया चषकाचे पहिलेच वर्ष होते. यावेळी भारताने जेतेपद पटकावले होते, तर श्रीलंकेने उपविजेतेपद पटकावले होते.
दिलीप वेंगसरकर यांनी भारताला दुसऱ्यांदा आशिया चषकाचे जेतेपद जिंकवून दिले होते. वेंगसरकर हेदेखील मुंबईचेच होते. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा भारताने सहज पाठलाग केला. कर्णधार वेंगसरकर यांनी नाबाद 50 धावांची खेळी काढत संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.