दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने दमदार फलंदाजी केली होती. धवन आता फॉर्मात आला आहे, असे बरेच जण म्हणत आहेत. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मात्र धवनला आता विश्रांती देण्यात यावी, असे मत व्यक्त केले आहे.
पाकिस्तानविरुद्ध धवनने 100 चेंडूंमध्ये तब्बल 16 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 114 धावा केल्या होत्या. रोहित आणि धवन या दोघांनीही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतके झळकावली होती. या दोघांनी तब्बल 210 धावांची सलामीही दिली होती. या दोघांच्या फलंदाजीमुळेच भारताला पाकिस्तान सर्वात मोठा विजय मिळवता आला होता.
धवनबद्दल मांजरेकर म्हणाले की, " धवन आता चांगली फलंदाजी करत आहे. पण तो इंग्लंडचा दौरा खेळून आला आहे. दुबईमध्ये आता तापमानही जास्त आहे, त्यामुळे खेळाडूंना दुखापती होऊ शकतात. आता भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धवनला विश्रांती द्यावी आणि त्याच्या जागी लोकेश राहुलला संघात स्थान द्यावे," असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.