मुंबई, आशिया चषक 2018 : आशियातील अव्वल सहा संघांमध्ये आजपासून रणसंग्राम सुरू होत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या सामन्याने 14व्या आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होईल. पण, या स्पर्धेत प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीची... जेतेपदाचे दोन प्रबळ दावेदार समोर येतील तेव्हा त्याला अंतिम लढती इतकेच महत्त्व असणार आहे. पण, आशिया चषक स्पर्धेत एक संघ असा आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा संघ भारतासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो.
( भारत-पाक लढतीतील 'सुपर फाईव्ह' )
भारत आणि पाकिस्तान यांच्याव्यतिरिक्त आशिया चषक स्पर्धेत बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचाही समावेश आहे. भारताला 'A' गटात पाकिस्तान आणि हाँगकाँग यांचा सामना करावा लागणार आहे, तर 'B' गटात अफगाणिस्तान, बांगलादेश व श्रीलंका यांच्यात चुरस पाहायला मिळेल. या स्पर्धेत भारताने सर्वाधिक सहा जेतेपद जिंकली आहेत. त्यापाठोपाठ श्रीलंकेच्या नावावर पाच जेतेपद आहेत. पाकिस्तानने ( 2000 व 2012) केवळ दोनवेळा आशिया चषक उंचावला आहे. बांगलादेशला ( 2012 व 2016) दोनवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी आशिया चषक स्पर्धेतून प्रत्येकी एकदा माघार घेतली आहे. आशिया चषक स्पर्धेच्या 13ही मोसमात खेळण्याचा मान श्रीलंकेने मिळवला आहे. सर्वाधिक 35 विजय त्यांच्या नावावर आहेत.
( Asia Cup 2018: विराटच्या अनुपस्थितीतही भारतच जेतेपदाचा प्रबळ दावेदार, 'दादा'चे भविष्य)
( Asia Cup 2018 : 'मिशन आशिया'साठी भारतीय खेळाडूंचा कसून सराव )
श्रीलंकेचा सध्याचा हरवलेला फॉर्म ही भारतासाठी जमेची बाजू आहे. मागील वर्षभरात श्रीलंकेला 18 सामन्यांत केवळ 6 विजय मिळवता आले आहेत, तर 12 सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. याउलट भारताने 20 सामन्यांत 14 विजय मिळवले आहेत. त्यामुळे भारताचे पारडे जड वाटत आहे, परंतु आशिया चषक स्पर्धेतील आकडेवारी पाहता भारताला 'हा' शेजारी पाकिस्तानपेक्षा धोकादायक ठरू शकतो. हे संघ एकाच गटात नसले तरी उपांत्य किंवा थेट अंतिम फेरीत ते समोरासमोर येऊ शकतील.