दुबई : भारतीय संघ मंगळवारी कमकुवत मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध खेळेल त्यावेळी टीम इंडियाची नजर बुधवारी पाकिस्तानविरुद्ध होणाºया लढतीच्या तयारीवर असेल.नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये मजबूत आहे. दुबईत ४३ डिग्री सेल्सियसच्या जवळपास तापमान आहे. अशा स्थितीत मोठ्या लढतीपूर्वी भारताला संघाचे योग्य संयोजन साधणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. धोनी फॉर्मात आहे किंवा नाही, याचे उत्तर या स्पर्धेद्वारे मिळेल. भारतासाठी पाचव्या, सहाव्या व सातव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हे निश्चित नाही. धोनी जर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असेल, तर त्याला डेथ ओव्हर्समध्ये मोहम्मद आमिर व्यतिरिक्त उस्मान खान व हसन अली यांना सामोरे जावे लागेल.पाचव्या क्रमांकावर केदार जाधव किंवा मनीष पांडे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. जर माजी कर्णधार धोनी सहाव्या क्रमांकावर खेळणार असेल तर सातव्या क्रमांकावर हार्दिक पांड्याची मोठे फटके खेळण्याची क्षमता भारतासाठी महत्त्वाची ठरू शकते. मधली फळी गेल्या काही दिवसांपासून भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पुढील वर्षी होणाºया विश्वकप स्पर्धेपूर्वी भारताला ही समस्या सोडवावी लागणार आहे. लोकेश राहुल तिसºया क्रमांकावर फलंदाजी करण्याची आशा आहे, पण आमिर किंवा हसन यांचे आत येणार चेंडू त्याच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. धवन, राहुल व पांड्या यांना खेळपट्टीवर वेग व लेंथ यासोबत जुळवून घ्यावे लागेल. बुमराह, भुवनेश्वर, कुलदीप व चहल हे पुन्हा एकदा मैदानावर दिसतील. गेल्या वर्षभरात या गोलंदाजांनी भारताला अनुकूल निकाल मिळवून दिले आहेत.
प्रतिस्पर्धी संघभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दिनेश कार्तिक आणि खलील अहमद.हाँगकाँग : अंशुमान रथ (कर्णधार), ऐजाज खान, बाबर हयात, कॅमरन मॅक्युलसन, ख्रिस्तोफर कार्टर, अहसन खान, अहसन नवाज, अर्शद मोहम्मद, किंचित शाह, नदीम अहमद, राग कपूर, स्कॉट मॅकेहनी, तन्विर अहमद, तनवी अफजल, वकास खान आणि आफताब हुसेन.सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजतापासून.