मुंबई, आशिया चषक 2018: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेच्या आजच्या लढतीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात हे दोन्ही संघ समोरासमोर आले की तणावजन्य परिस्थिती निर्माण होणे साहजिकच आहे. त्याचे पडसाद मैदानावरही पाहायला मिळाले आहेत. आशिया चषक स्पर्धेतील उभय संघांमधील लढतीच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंमधील मैदानावर रंगलेले पाच ठसन प्रसंग पाहूया... गौतम गंभीर वि. शाहिद आफ्रिदी - या दोन खेळाडूंमध्ये रंगलेली ठसन कोणी विसरूच शकत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एका सामन्यात आफ्रिदीने धाव घेणाऱ्या गंभीरच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गंभीरने आपल्या खांद्याने आफ्रिदीला जोरदार धक्का मारला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक वाद झाले. वेंकटेश प्रसाद वि. आमीर सोहेल - 1996च्या विश्वचषक स्पर्धेतील हा प्रसंग पाहताना आजही मनात आनंदाचे कारंजे उडतात. वेंकटेश प्रसादच्या गोलंदाजीवर चौकार लगावत सोहेलने भारतीय गोलंदाजाला डिवचले. प्रसादने पुढच्याच चेंडूवर सोहेलचा त्रिफळा उडवून त्याला तंबूची वाट दाखवली. वीरेंद्र सेहवाग वि. शोएब अख्तर - भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने एका कार्यक्रमात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील एक प्रसंग सांगितला. एका सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर वारंवार बाऊंसर चेंडू टाकून सेहवागला डिवचत होता आणि त्याला हुक शॉट मारण्यास सांगत होता. तेव्हा सेहवागने नॉन स्ट्राईकवर असलेल्या सचिन तेंडुलकरला बाऊंसर टाकण्यास सांगितला. तेंडुलकरने अख्तरचा तो बाऊंसर सीमारेषे पलिकडे टोलावला. हरभजन सिंग व शोएब अख्तर - हरभजन सिंग आणि शोएब अख्तर हे आता चांगले मित्र आहेत, परंतु एकेकाळी मैदानावर त्यांच्यात चांगलीच जुंपली होती. 2010च्या आशिया चषक स्पर्धेतील लढतीत या दोघांमध्ये वाद झाला होता. भारतीय संघ 268 धावांचा पाठलाग करत होता. अखेरच्या चार षटकांत अख्तरने भारताचा फिरकीपटू हरभजनला मुद्दाम डिवचले. हरभजनने त्याला आपल्या बॅटीने उत्तर देण्याचे ठरवले आणि त्याने एक खणखणीत षटकार खेचला. हरभजनने फटकेबाजी कायम राखताना भारताला विजय मिळवून दिला. गौतम गंभीर वि. कामरान अकमल - 2010च्याच आशिया चषक स्पर्धेतील सामन्यात भारताचा सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमल यांच्यात चकमक पाहायला मिळाली. आफ्रिदीच्या गोलंदाजीवर अकमलने विनाकारण गंभीर झेलबाद असल्याची अपील केली. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकमध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मध्यस्थी करावी लागली.