नवी दिल्ली, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी बऱ्याच कालावधीनंतर एकमोकांसमोर उभे ठाकणार आहेत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 19 सप्टेंबरला सामना रंगणार आहे. पण या सामन्यात एक खेळाडू ट्रम्प कार्ड ठरू शकतो, असे मत भारताचा माजी महान खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने सांगितले आहे.
भारताकडे महेंद्रसिंग धोनीच्या रुपात सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याचबरोबर रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या संघातही युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय आहे.
लक्ष्मणने सांगितले की, " या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघातील शोएब मलिक हा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. कारण तो एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. मधल्या फळीत धावा करण्याबरोबर तो चांगली गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या सामन्यात ट्रम्प कार्ड ठरू शकतो. "