दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध अफगाणिस्तान : महेंद्रसिंग धोनीला मिडास राजाची उपमा दिली जायची. धोनीचे नेतृत्त्व जादुई होते, असेही म्हटले जायचे. त्यामुळेच त्याच्या बाबतीतही एक अशी अनपेक्षित गोष्ट घडली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीला भारताचे नेतृत्त्व करायची संधी मिळाली आणि हा त्याचा एक कर्णधार म्हणून दोनशेवा सामना होता. धोनी पुन्हा भारताचा कर्णधार होईल, असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. पण काही जणांनी मात्र यावर विश्वास होता आणि त्यांनी ट्विटरद्वारे तो व्यक्तही केला.
या स्पर्धेसाठी रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली असली तरी या सामन्यात मात्र संघाचे नेतृत्त्व धोनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. कारण भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि धोनीकडे संघाची कमान सोपवण्यात आली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जेव्हा धोनी नाणेफेकीसाठी आला तेव्हा साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. तब्बल 696 दिवसांनंतर धोनीने भारताचे कर्णधारपद भूषवले.