दुबईः आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड दिसत असलं, तरी बांगलादेशचे दोन शिलेदार टीम इंडियाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. 'सुपर फोर'मध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का देण्याची किमया बांगलादेशनं केली होती. त्यांचा मधल्या फळीतला वीर मुश्फिकुर रहीम आणि वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान ही जोडगोळी या विजयाची शिल्पकार ठरली होती. त्या दोघांपासून टीम इंडियानं सावध राहण्याची गरज असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
यष्टिरक्षक-फलंदाज मुश्फिकुर रहीम यानं आशिया चषकातील आपल्या कामगिरीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये त्यानं १४४, २१, ३३ आणि ९९ अशा एकूण २९७ धावा केल्यात. त्यांच्यापेक्षा जास्त धावा फक्त शिखर धवननं (३२७) केल्या आहेत. मुश्फिकुरच्या ९९ धावांच्या जोरावरच बांगलादेशनं पाकिस्तानला २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे त्याला झटपट बाद करण्यासाठी वेगळी रणनीती आखणं गरजेचं आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमाननं पाकिस्तानच्या चौकडीला तंबूत धाडलं होतं. चार सामन्यात त्यानं ८ विकेट्स घेतल्यात. त्याचा वेग आणि टप्पा अचूक आणि भेदक असल्यानं तोही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. डावखुऱ्या गोलंदाजांचा सामना करताना रोहित शर्मा काहीसा अडखळतो. त्यामुळे मुस्तफिजूरला थोडं सांभाळूनच खेळावं लागेल.
इतिहास भारताच्या बाजूने!
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा संघ अपराजित राहिला आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना टीम इंडियाने पराभूत केलंय, तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला बरोबरी पत्करावी लागलीय. स्वाभाविकच, भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे आणि सगळेच शिलेदार फॉर्मात आहेत.
आत्तापर्यंतच्या आशिया चषक स्पर्धांमध्ये भारत ५३ सामने खेळला असून त्यापैकी ३५ सामने टीम इंडियाने जिंकलेत. १६ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामने बरोबरीत सुटलेत.
याउलट, आत्तापर्यंतच्या आशिया चषकात बांगलादेश ४७ सामने खेळलाय आणि फक्त १० सामनेच जिंकू शकलाय.