मुंबई, आशिया चषक २०१८: जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीआशिया चषक स्पर्धेत खेळत नसल्याचे दु:ख केवळ चाहत्यांनाच नाही, तर या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना (ब्रॉडकास्टर) असल्याचे कळत आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात विराटचे नाव नसल्याने ब्रॉडकास्टर्सनी नाराजी व्यक्त करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सोबत शीतयुद्ध पुकारल्याची माहिती समोर येत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अधिकारी थुसित परेरा यांना BCCI ने मेलद्वारे पाठवलेले उत्तर प्रसिद्ध केले आहे. त्यात BCCI चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी असे नमूद केले आहे की," माजी क्रिकेटपटूचा समावेश असलेल्या तज्ज्ञांच्या निवड समितीने आशिया चषक स्पर्धेसाठी संघ निवडला. उपलब्ध खेळाडूंपैकी सर्वोत्तम खेळाडूंच्या संघाची घोषणा १ सप्टेंबरला आम्ही केली. संघ निवडीचा अधिकार निवड समितीला आहे. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद किंवा ब्रॉडकास्टर एखाद्या खेळाडूच्या निवडीसाठी दबाव आणू शकत नाही किंवा कोणतेही प्रश्न उपस्थित करू शकत नाही."
विराटच्या अनुपस्थितीबाबत स्टार वाहिनीने आशियाई क्रिकेट परिषदेला नाराजी पत्र पाठवले असल्याचा दावाही इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. "२९ जून २०१७ मध्ये आशिया चषक स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा करार आपल्यात झाला. त्यावेळी सहभागी प्रत्येक संघ स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करतील अशी शास्वती देण्यात आली होती. विराट कोहली हा आघाडीचा यशस्वी फलंदाज आहे. त्याची अनुपस्थिती आमच्या महसुलावर परिणाम करणारी ठरत आहे," अशा आशयाचे पत्र स्टारने आशियाई क्रिकेट परिषदेला पाठवले आहे.
महिन्याभराच्या इंग्लंड दौऱ्यानंतर निवड समितीने विराटला आशिया चषक स्पर्धेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना मंगळवारी हाँगकाँगशी होणार आहे.