दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन यांनी द्विशती सलामी दिली होती. या दमदार फलंदाजीचे रहस्य त्यांच्या संवादांमध्ये दडलेले आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन बॅटींग करताना काय बोलतात? हे तुम्हाला माहिती आहे का...
रोहित आणि धवन या दोघांनीही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतके झळकावली होती. या दोघांनी तब्बल 210 धावांची सलामीही दिली होती. या दोघांच्या फलंदाजीमुळेच भारताला पाकिस्तान सर्वात मोठा विजय मिळवता आला होता. या फलंदाजीचे, भागीदारीचे रहस्य रोहित शर्माने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
रोहित म्हणाला की, " आम्ही दोघे जेव्हा सलामीला उतरतो, तेव्हा काही गोष्टी मनाशी पक्क्या केलेल्या असतात. किती धावा करायच्या किंवा धावांचा पाठलाग करायचा हे आम्ही जास्त डोक्यात ठेवत नाही. पण हा सामना आपल्यासाठी नवीन आहे, सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यानुसार आपला नैसर्गीक खेळ आपण करायचा, असं आमचं बोलणं नेहमी सुरु असतं. आम्ही दोघे एकमेकांचं कौतुकही करतो आणि सल्लेही देतो. एकमेकांना आम्ही सांभाळून घेतो आणि हेच सर्वात महत्त्वाचे आहे. "