दुबई, आशिया चषक स्पर्धा 2018 : इंग्लंडमधील कसोटी मालिकेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या स्पर्धेसाठी रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेत कोहली खेळणार नसल्याने त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. पण भारतीय संघातील एका खेळाडूने कोहलीच्या चाहत्यांची बोलती बंद केली आहे.
या स्पर्धेत कोहली खेळणार नसल्याने भारतीय संघ सामने कसे जिंकणार, अशी चिंता विराटच्या चाहत्यांना सतावत होती. पण भारतीय संघातील एका खेळाडूने, " कोहली जरी संघात नसला तरी धोनी आहे ना, " असे आपले मत व्यक्त केले आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना हाँगकाँगबरोबर होणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे.
भारतीय संघातील अंबाती रायुडूने यावेळी सांगितले की, " भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीसारखा अनुभवी खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूला तो मदत करत असतो. त्याच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला आहे. त्यामुळे संघात धोनी असेल तर आम्हाला कसलीच चिंता नसते. कोहली संघात नसला तरी धोनीसारखा खेळाडू हा संघासाठी आधआस्तंभ आहे. "