दुबई, आशिया चषक 2018 : चार वर्षांनंतर आशिया चषक उंचावण्यासाठी सज्ज असलेल्या श्रीलंकेच्या संघाला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. सराव सामन्यात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे त्यांचा सलामीचा फलंदाज धनुष्का गुणतिलकाने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात दिनेश चंडिमल यालाही बोटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेला मुकावे लागले. गुणतिलकाच्या जागी संघात अष्टपैलू खेळाडू शेहान जयसुर्याला संधी मिळाली आहे.
शेहानने नोव्हेंबर 2015 मध्ये त्याने वन डेत पदार्पण केले, परंतु सातत्यपूर्ण खेळ न केल्यामुळे त्याला संघात स्थान कायम राखता आलेले नाही. त्याने 8 वन डे सामन्यात 69 धावा केल्या आहेत. त्याला वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेतही अपयश आले. मात्र, गुणतिलकाच्या दुखापतीमुळे त्याला पुन्हा संधी मिळाली आहे.
वन डे पदार्पण केल्यापासून शेहान चर्चेत आहे तो त्याचा आडनावामुळे. श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसुर्या याच्याशी शेहानचे नातं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता त्या पुन्हा रंगत आहेत.