भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये आज आशिया चषक स्पर्धेत महामुकाबला होणार आहे. आशिया स्पर्धेत हे शेजारी 11 वेळा समोरासमोर आले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत जाणवत असली तरी संघाकडे एक हुकमी एक्का आहे आणि त्याची पाकिस्तान संघाने धास्ती घेतली आहे. विराटच्या उपस्थितीतही कठीण प्रसंगी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचे नेतृत्व सांभाळताना पाहिले आहे. त्यामुळेच विराट नसला तरी धोनीची उपस्थिती पाकिस्तानसाठी धोक्याचा इशारा आहे.
(Asia Cup 2018 : भारताविरुद्ध पाकिस्तानचे पारडे 'या' गोष्टींमुळे जड)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच तणावात खेळला गेलेला आहे. दोन्ही देशांचे संबंध लक्षात घेता क्रिकेट चाहत्यांच्या वाढलेल्या अपेक्षांचे ओझे घेऊन खेळाडूंना मैदानावर उतरावे लागते. या प्रचंड दबावातही स्वतःला 'कूल' ठेवत संघाला विजय मिळवून देण्याचे कौशल्य फार कमी खेळाडूंमध्ये पाहायला मिळाले आहे. येथे भावनेपेक्षा सद्सद्विवेकबुद्धी महत्त्वाची असते आणि हीच बाब धोनी चोख जाणतो. याची कल्पना पाकिस्तानच्या खेळाडूंनाही आहे. त्यामुळेच आजच्या सामन्याची सर्व समिकरणं धोनीभवती फिरणारी आहेत.
( Asia cup 2018: भारताचा दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध अवघ्या 26 धावांनी विजय; शिखर धवनचे दमदार शतक )
धोनीला घाबरण्याचे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे आशिया चषक स्पर्धेतील आकडेवारी. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या पाच विजयांपैकी तीन सामने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेली आहेत. सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखाली संघाने प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक स्पर्धेतील सर्वाधिक 330 धावा करण्याचा पराक्रम भारताने 2012 मध्ये केला होता. आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्येही धोनी चौथ्या क्रमांकावर येतो. कर्णधार म्हणून सर्वाधिक तीन झेल टिपण्याचा विक्रमही धोनीच्या नावे आहे.
रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार असला तरी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत खरा 'मास्टर माईंड' धोनीच असणार आहे. आशिया चषक पलीकडे सांगायचे तर २००७ च्या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आणि २०११ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना जरा आठवून पाहा...