एकेकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की बोटावरची नखं पार नाहीशी होइपर्यंत कुडतडली जायची... मैदानावर खेळाडूंमध्ये 'अरे ला कारे' असा सूर लागला की इथे स्टेडियमवर एकमेकांची कॉलर हातात यायला वेळ लागायचा नाही... म्हणूनच क्रिकेट असो किंवा अन्य कोणतेही मैदान हे देश समोर आले की वातावरणातील गांभीर्य अचानक वाढायचे, हवेतील गारव्याची जागा बोचरी उष्णता घ्यायची.. काळ बदलला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध जैसे थेच आहेत... पण खेळाडूंची मानसिकता बदलली आहे आणि याची प्रचिती कालच्या सामन्यातून आली. आशिया चषक स्पर्धेत हे कट्टर प्रतिद्वंदी पुन्हा समोर आले आणि जुन्या जखमांची चाळण पुन्हा फिरू लागली. आपण त्यांना असे लोळवले होते, त्याचा वचपा त्यांनी असा काढला, इत्यादी इत्यादी... पण हे चित्र बदलतय निदान खेळाडूपुरते तरी, याचा आनंद आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना अन्य सामन्या सारखाच जाणवला. रोहित शर्मा व शिखर धवन पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई तर करत होतेच, परंतु त्याचवेळी एकमेकांसोबत त्यांची चेष्टा मस्करीही चालली होतीच. दोन्ही संघ जिंकण्यासाठीच मैदानावर उतरले होते, म्हणून काय एकमेकांना उगाच कोणी डिवचले नाही. भारताने आठ विकेट राखून पाकिस्तानला नमवले. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत रोहित शर्मा आणि सर्फराज अहमद चांगले गप्पा मारताना दिसले. क्रिकेट पलीकडे त्यांनी एकमेकांना जोक्सही शेअर केले. हा सामना आमच्यासाठी अन्य लढतींप्रमाणेच असेल असे दोन्ही देशांच्या कर्णधारांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे दोन्ही संघ बुधवारी मैदानावर उतरले ते अगदी खेळी मेळीच्या वातावरणात खेळण्याच्या निर्धारानेच. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने तर पाकिस्तानच्या उस्मान खानच्या बुटांची लेस बांधणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भारत - पाकिस्तान यांच्या क्रिकेट वादात भरडली जाणाऱ्या टेनिसपटू सनिया मिर्झाने या सामन्यापूर्वी सोशल मीडियावरुन रजा घेतली. कोणताही मनस्ताप नको अशी तिची भावना होती. पण जाताजाता हा फक्त क्रिकेट सामना आहे हे लक्षात राहुद्या, असा सल्ला तिने दिला. क्रिकेटसह अन्य कोणत्याही खेळात दोन्ही देशांचे खेळाडू समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण दिसते. दोन्ही देशांच्या खेळाडूंना ते कळत, परंतु क्रीडा प्रेमींच काय?